आपणांस माहितच आहे की भारतीय जनगणना 2010 चा पहिला टप्पा संपलेला असून त्यामध्ये कुटूंबांची गणना करण्यात आली होती. जनगणनेचा दूसरा व महत्वाचा टप्पा 9 फेब्रुवारी 2011 पासून आरंभ होत असून या टप्प्यात व्यक्तिंची गणना अर्थात जनगणना होत असून यामध्ये प्रत्येक व्यक्तिच्या धर्माची, जातींची तसेच भाषा आदींची नोंद करण्यात येणार आहे. सरकारी धोरणांसाठी आकडेवारी पुरविण्याचे काम जनगणनेच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे सामाजिक, राजकीय तसेच शैक्षणिक आदी सर्व क्षेत्रात जनगणना ही दिर्घकालिक प्रभाव पाडते, त्यामुळे भारतीय समाज जीवनात जनगणनेला असाधारण महत्व आहे.
भारत ही बुद्धभूमी असून बाबासाहेबांच्या मतानुसार सर्व भारतीय विशेष करून शुद्र (ओबीसी) आणि अतिशुद्र (एससी/एसटी) बौद्ध धर्माचे अनुयायी होते. असे असले तरी 2001च्या जनगणनेनुसार भारतात बौद्धांची लोकसंख्या 79,55207 एवढी नाममात्र दर्शविण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात महार समाजाची लोकसंख्याच 81,60,596 एवढी आहे. तात्पर्य असे कि महार समाजाने धर्मांतर करुन बौद्ध धर्माचा स्वीकार केला असला तरी ही जनगणनेत बौद्धधर्माचा उल्लेख सर्वानी केला नाही. याचे सर्वज्ञात कारण म्हणजे आरक्षण जाण्याची भिती, हे होय. सरकार अनुसूचित जातीच्या लोकांना आरक्षण देत होते पण धर्मांतरीत बौद्धांना नाही. त्यामुळे आचार विचार व संस्काराने संपूर्णत: बौद्ध असलेल्या लाखों अनुसूचित जाती/जमातीच्या लोकांनी निदान शैक्षणिक आरक्षण मिळावे ह्या अनिवार्य आशेपायी आपली पूर्वीची जात कायम ठेवली पण त्यांनी धर्म ‘बौद्ध’ लिहीण्याचे टाळले. परिणामी महाराष्ट्रातील बौद्धांची लोकसंख्या कमी दिसून आली. अनुसूचित जाती/जमातींची अशीच कुचंबना संपूण भारतभर पहावयास मिळते. त्याचा परिणाम बौद्धांच्या लोकसंख्येवर झाल्याचे स्पष्टपणे जाणवते. त्यामुळे निश्चितपणे असे म्हणता येईल की 2001 मध्ये नोंदलेली भारतातील बौद्धांची 79,55, 207 ही लोकसंख्या जी एकूण लोकसंख्येच्या 0.8% आहे, वास्तविक नाही.
बंधुनो, ह्या जनगणनेच्या निमित्ताने आपला स्वाभिमान व धर्म जोपासण्याची सुवर्ण संधी आपणांस मिळत आहे. आरक्षण जाईल या भितीमुळे म्हणा पूर्वी जे झाले ते सर्व विसरुन येत्या जनगणनेत आपला धर्म ‘बौद्ध’ व जातीच्या रकान्यात (अनुसूचित जाती/जमाती असल्यास जी लागू असेल ती उदा. महार, चांभार) आपली जात लिहा. कारण, 1950 व 1990च्या संवैधानिक नियमांनुसार अनुसूचित जाती/जमातीचे लोक बौद्ध धर्माचे असू शकतात. त्यामुळे धर्म बौद्ध लिहील्यावर सुद्धा आपल्याला जातीचा उल्लेख करणे आवश्यक ठरते. तसे न केल्यास खुल्या वर्गात (Open Category) आपला समावेश होईल व अर्थातच आपले आरक्षण कमी होईल. राजकीय, शैक्षणिक तसेच सामाजिक आरक्षण (शासकीय योजना, नोक-या व आर्थिक तरतुदी) या सारख्या संवैधानिक अधिकार हे धर्मावर आधारित नसून जातीवर आधारीत आहेत. अशाप्रकारे जातीच्या उल्लेखाने बौद्ध धर्मात जातीवाद वाढेल किंवा बौद्ध धर्मात जातीच नाहीत, अशा भावनीक व सैद्धांतिक संभ्रमात राहणे हिताचे होणार नाही. केवळ जातीचा उल्लेख न केल्याने हिंदू, सिख, मुस्लिम व ख्रिस्ती धर्मांतून जातीवाद समाप्त झालाय का? त्यामुळे, केवळ जातीचा उल्लेख केल्याने जातीवाद वाढेल असे म्हणणे चुकीचे ठरते. बौद्ध धर्माची दिक्षा घेतल्यानंतर दिनांक 15 ऑक्टोबर 1956 या दिवसी आरक्षणाच्या संदर्भात बाबासाहेब म्हणाले होते की, ‘माझ्या लोकांना आरक्षण कसे मिळेल, या साठी माझ्या पोतळीत अनेक उपाय आहेत.’ अर्थात बौद्ध धर्माच्या दिक्षेसह आरक्षण कसे कायम राहिल यासाठी ते जागरूक होते हे स्पष्ट होते. जातीव्यवस्था समाप्त करण्यासाठी ‘रोटी-बेटी व्यवहार, ब्राम्हणांनी रचलेल्या ग्रंथांची पवित्रता नष्ट करणे, शुद्रातिशुद्रांचे जीवनमान उंचावणे, त्यांचा स्वाभिमान जागविणे, त्यांना उच्च शिक्षणाची प्रेरणा देवून स्वावलंबी बनविणे’ हे उपाय बाबासाहेबांनी सांगितलेले आहेत. हे उपाय न केल्याने जातीवाद वाढेल. तेव्हा, फक्त जात लिहील्याने जातीवाद वाढेल असे म्हणण्यात काही अर्थ नाही. परंतु, अनुसूचित जाती व जमातीच्या यादींमध्ये केन्द्र व राज्य सरकारांनी सुधारणा केल्यास जातींच्या उल्लेखाची गरजच भासणार नाही.
2001च्या जनगणने प्रमाने भारता पालि बोलणा-यांची संख्या शुन्य आहे. पालिभाषेचे महत्व ओळखुन बाबासाहेबांनी पालि भाषेचा शब्दकोष तयार केला व संविधानात त्याची तरतुद केली. पालिभाषेच्या माध्यमातुन आरोग्यशास्त्र, मानसशास्त्र तसेच भगवान बुद्धांच्या शिकवणुकीचा अभ्यास करता येतो. आमच्या प्रत्येक शुभ कार्याचा नव्हे प्रत्येक दिवसाचा आरंभ पंचशिल त्रिसरणाने होत असतो. पंचशिल व त्रिसरणाच्या गाथा पालि भाषेत आहेत. केवळ महामंगलसुत्त, जयमंगलअठ्ठगाथा, धम्मपालनगाथा अशा अनेक पालि गाथा कित्येकांच्या तोंडपाठ असून आमची कित्येक पाल्ये शाळा/कॉलेजातून पालि भाषा शिकत आहेत. तरी या जनगणनेत भाषेच्या रकान्यात मातृभाषा किंवा अन्य भाषांमध्ये ‘पालि’ भाषा येते असा उल्लेख करणे आवश्यक आहे. पालि भाषेच्या अभ्यासकांनी व भन्ते यांनी पहिली भाषा व इतरांनी दुसरी किंवा तीसरी भाषा म्हणुन पालिभाषेची नोंद करावी. तसे झाल्यास सरकारी पातळीवर पालिभाषेची दखल घेतली जाईल.
तेव्हा समस्त बहुजनांना सामाजिक जाणीवेतुन एकच आग्रहाचे आवाहन करीत आहोत की 9 फेब्रुवारी 2011 मध्ये सुरू होणा-या जनगणनेच्या दूस-या टप्प्यामध्ये आपल्या विषयीची माहिती देतांना आपला धर्म ‘बौद्ध’ व जात (अनुसूचित जाती/जमाती नुसार जी लागू असेल ती) व मातृभाषा किंवा अन्य भाषेमध्ये पालि भाषेचा समावेश करावा.
जनगणना प्रगणकाने तशी नोंद केल्याची खात्री करा व इतरांना सुद्धा असाच मजकूर लिहायला सांगा. जेणे करुन, भारतातील बौद्धांची खरी संख्या दिसेल व त्या लोकसंख्येच्या प्रमाणात सामाजिक, शैक्षणिक व राजकीय आरक्षण मिळेल. पर्यायाने बाबासाहेबांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न काही अंशी पुर्ण होईल.
बाबासाहेबांचे स्पप्न पुर्ण करा! जनगणनेत धर्म ‘बौद्ध’ लिहा!!
मित्रांना, नातेवाईकांना, शेजा-यांना सांगा! नाही तर पुन्हा दहा वर्ष संधी नाही.



